Sunday, 4 December 2011

श्री तुळजाभवानी

॥ जगतजननी कुलस्वामिनी ॥
॥ श्री तुळजाभवानी ॥





तुळजाभवानी-पौराणिक संदर्भ
भारतीय संस्कृतीचे प्राचीन महाकाव्य म्हणून गणल्या गेलेल्या पुराणात तुळजाभवानी देवीबद्दल अत्यंत भक्तीभावयुक्त अनेक उल्लेख आहेत. मार्कंडेय पुराणाच्या "दुर्गा सप्तशती" या खंडात एकूण तेरा अध्यायात ७०० श्लोकातून देवीच्या दिव्य शक्तीचे वर्णन केले गेले आहे. देवीने महिषासुर नामक दैत्याचा वध कसा केला याचे सविस्तर वर्णन मार्कंडेय पुराणात आले आहे. शके १८२० मध्ये देवीचे अनन्य भक्त पांडुरंग जनार्धन यांनी ३६ अध्यायात व २६०५ ओव्यात महिषासुर संहाराच्या कथेचे मूळ संस्कृत मधून रसाळ मराठीत भाषांतर केले आहे. युगायुगा पासून तुळजाभवानी देवीची महती, अनेक नाम संकीर्तनातून, लोकनाट्यातून, लोककथांतून व कवनातून अतिशय सविस्तरपणे वर्णिली जात असून देवीची स्फूर्तीदायी कथा ही राष्ट्राच्या आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय अस्मितेचा अखंड प्रेरणा स्रोत ठरली आहे. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या समकालीन संतांनी तुळजाभवानी देवीस "मनुष्याच्या दुर्बलतेची विनाशका" मानले तर योगी अरविंदांनी देवीस राष्ट्रीयतेची भावना चेतविणारी प्रेरणा मानले.

श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती

देवीच्या मंदिरातील सभामंडपाच्या पश्चिमेला गर्भगृहात देवीची दिव्य मूर्ती स्थित आहे. गर्भगृहाच्या दारातच चांदीचे दोन उंच सिंह ठेवलेले आहेत. देवीचे आतील सिंहासन प्रशस्त असून त्यावर श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती उभी असलेली दिसते. ही मूर्ती स्वयंभू असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. काळ्या शाळीग्रामातील ही मूर्ती सिंहवाहिनी व अष्टभुजा असून त्यापैकी सहा हातात तिने चक्र, बाण, धनुष्य, गदा, तलवार, शंख, इ. विविध शस्त्रे धारण केली आहेत. उजव्या बाजूच्या सर्वात खालच्या हातात त्रिशूल असून तो महिषासुराच्या बरगडीत खुपसलेला आहे तर दुस-या हाताने त्याची शेंडी धरलेली आहे. पायाखाली रेड्याच्या स्वरूपात दैत्याचे शव आहे. मूर्तीच्या प्रभावळीत उजव्या बाजूस सिंह तर डाव्या बाजूस मार्कंडेय ऋषी कथा सांगताना दिसतात. जिच्यासाठी हा अवतार झाला ती तपस्विनी अनुभूती डावीकडे तपश्चर्येच्या मुद्रेत बसली आहे. देवीच्या मस्तकावरील मुकुटात शिवलिंग आहे.
या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आद्य शंकराचार्य यांनी केली असे सांगितले जाते. तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अन्य देवस्थानातील मूर्ती प्रमाणे स्थिर नसून, भारतातील ही एकमेव चल मूर्ती आहे. वर्षातून तीन वेळा मूर्तीस विधीपूर्वक मूळ स्थानावरून हलविले जाते व देवी शयन करण्यासाठी जाते.

नित्योपचार पूजा

श्री तुळजाभवानी देवीच्या नित्योपचाराच्या वेळा अशा आहेत.
पहाटे ४ वाजता :  मुख्य प्रवेशद्वारावर चौघडा वाजवून नित्योपचार विधी सुरु होत असल्याचे जाहीर केले जाते.
पहाटे ५ वाजता :  मुखप्रक्षालन व चरणतीर्थ पूजा.
सकाळी ७ वाजता : अभिषेक पूजा.
दुपारी १२ वाजता : वस्त्रालंकार पूजा व आरती.
रात्री ७ वाजता : अभिषेक पूजा.
रात्री ९ ते ९.३० : प्रक्षालन

देवीचे मंदिर पहाटे २ वाजता उघडले जाते व रात्री १० वाजता बंद होते.
विशेष प्रसंगी मंदिर पहाटे १ वाजताही उघडण्यात येते.


छबिना
देवीच्या कोणत्याही उत्सवात पारंपरिक छबिना महत्वाचा असतो. प्रत्येक मंगळवारी व पौर्णिमेस सायंकाळच्या पूजेनंतर मंदिर प्रांगणात देवीचा छबिना काढण्यात येतो. छबिन्यात तुळजाभवानी देवीची चांदीची मूर्ती व पादुका सुशोभित पालखीत ठेवली जाते. छबिना म्हणून मिरविली जाणारी पालखी वाघ, मोर, हत्ती, घोडा, नंदी, गरुड इत्यादी वाहनावर ठेवून भक्त पालखी खांद्यावर घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. या छबिन्याचा थाट खूप निराळा व आकर्षक असतो. मार्गावर पारंपारिक गायक-वादक, गोंधळी इ. कलाकार देवीची गाणी, पदे, कवने, यांचे गायन करतात. त्याचवेळी चौघडा, संबळ ही पारंपरिक वाद्ये वाजविली जातात. देवीचा छबिना पाहण्यासाठी मंदिर प्रांगणात दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी उसळते.

No comments:

Post a Comment